दुर्देवी: भोसरीत २० हजारांच्या हुंड्यासाठी पत्नीला अमानुष मारहाण; पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

0
602

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – माहेरहून २० हजारांचा हुंडा आणत नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसीतील गवळी माथा येथे घडली.

किरण रमेश यादव (वय २१, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, एमआयडीसी, भोसरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पती रमेश चंद्रबली यादव (वय २७, रा. गवळी माथा, टेल्कोरोड, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली आहे. तर शत्रुघ्न सीतलाप्रसाद यादव (वय ५५, रा.पचारी खुर्द, पो. बितेहरा, तह उदवली, जि.बस्ती, उत्तरप्रदेश) यांनी मंगळवार (दि.१६) फिर्याद दिली आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ मध्ये किरण हिचा रमेश सोबत विवाह झाला होता. तेव्हा पासून आरोपी पती रमेश हा किरणने माहेरहून २० हजार रुपये आणावेत यासाठी शारिरीक आणि मानसिक छळ करत होता. त्याने बऱ्याचदा किरणला मारहाण करुन गंभीर जखमी देखील केले होते. यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती रमेश याला अटक केली आहे. तर डॉक्टरांच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल ज्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती पाटील यांनी दिली.