कर्नाटक सरकार ‘सर्वोच्च’अडचणीत, बंडखोर आमदारांना विधानसभेत गैरहजर राहण्याची मुभा

0
405

बंगळुरू, दि. १७ (पीसीबी) – कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांना विधानसभेत हजेरी लावण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही असा निर्णय देत सर्वोच्च न्यायालायने कुमारस्वामी यांच्या सरकारला जोरदार झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी म्हणजेच उद्या कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडणार असून सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना यामध्ये सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय घेण्याची मुभा बंडखोर आमदारांना दिली आहे.

राज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे स्वीकारण्याचे आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना द्यावेत, अशी मागणी काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी केली होती. याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यास सांगितले असून त्यांच्यावर वेळेचे बंधन आणू शकत नाही असेही म्हटले आहे. त्यांना योग्य वाटेल त्यावेळी ते निर्णय घेतील असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावेळी आमदारांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असेही सांगितले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण केली. बंडखोर आमदारांचे राजीनामे, त्यांना अपात्र ठरवण्याबाबत जैसे थे स्थिती ठेवावी असा आदेश पीठाने दिला होता तो कायम ठेवावा, अशी मागणी बंडखोर आमदारांच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करताना ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी केली.

सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तर १५ बंडखोर आमदारांना पक्षादेशाच्या आधारावर सभागृहात हजर न राहण्याची मुभा द्यावी, कारण सत्तारूढ आघाडीचे सरकारच अल्पमतामध्ये गेले आहे, असेही रोहतगी म्हणाले होते.