दुकानातील कामगारांनी केला दहा लाखांचा अपहार

0
243

कुदळवाडी, दि. २५ (पीसीबी) – दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने सात लाख रुपयांचे ऑनलाइन पेमेंट स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच त्याचा अपहार केला. तर दुसऱ्या कामगाराने दुकानातील तीन लाख 48 हजार रुपये किमतीचे साहित्य मालकाच्या परस्पर विकले. ही घटना 13 एप्रिल 2021 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत कुदळवाडी चिखली येथे घडली.

जोस जोसेफ मॅथ्यू (वय 57, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय बसवराज श्रीगिरी (रा. आळंदी), पोपट दत्तात्रय भोसले (रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुदळवाडी मध्ये जे के टूल्स नावाचे दुकान आहे. तिथे आरोपी दत्तात्रय आणि पोपट हे काम करतात. दत्तात्रय याने ग्राहकांना दुकानातील क्रेडिटवर दिलेल्या मालाचे सात लाख रुपये ग्राहकांकडून ऑनलाईन माध्यमातून स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. त्या रकमेचा त्याने अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच कामगार पोपट याने दुकानातील तीन लाख 48 हजार रुपयांचा माल इतर दुकानदारांना विक्री करून त्याचे पैसे स्वतःकडे ठेवत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी पोपट भोसले याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.