दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी नाहीच; काँग्रेसकडून सहा उमेदवारांची यादी जाहीर

0
437

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची अखेर आघाडी झालेली नाही. काँग्रेसने सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना उमेदवारी जाहीर केली असून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिल्लीत तिरंगी लढत होईल, असे दिसते.

दिल्लीत लोकसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस आणि आप एकत्र येणार अशी चर्चा होती.  दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही वृत्त होते. मात्र, काँग्रेसमधील दिल्लीतील नेत्यांनी आपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. शीला दीक्षित यांनी आपसोबत आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता. तर काँग्रेसमधील एक गट आपसोबत आघाडीसाठी अनुकूल होता. आघाडीबाबतचा निर्णय राहुल गांधींकडे सोपवण्यात आला होता.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत निर्णय होत नसल्याने कमालीचा संभ्रम निर्माण झाला होता. रविवारी भाजपाने दिल्लीतील चार उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेस- आप काय निर्णय घेणार याची उत्सुकता निर्माण झाली होती.  आम आदमी पक्षानेही यापूर्वीच सात उमेदावारांची यादी जाहीर केली होती. आघाडीची चर्चेत वेळ वाया घालवण्याऐवजी  आम्ही प्रत्यक्ष प्रचाराकडे लक्ष देण्याची गरज होती, असे आपच्या नेत्यांनी म्हटले होते. अखेर काँग्रेसने सोमवारी सकाळी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आघाडीची शक्यता संपुष्टात आली.

काँग्रेसने उत्तर पूर्व दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून अजय माकन, चांदनी चौक येथून जे. पी अग्रवाल, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंग लवली, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोथिया, पश्चिम दिल्लीत महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. आता दिल्लीत भाजपा विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.