धरण फुटले, तर खेकडे जबाबदार ! मग मंत्रीपद का घेतले ?; अजित पवारांचा संतप्त सवाल  

0
438

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – ‘कालवा फुटला,  तर उंदीर जबाबदार, धरण फुटले तर खेकडे जबाबदार ! मग मंत्रीपद का घेतले ? भाजपा-सेनेचे मंत्री स्वतःचे अपयश केव्हा मान्य करणार? लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून जीवाशी खेळणारे हे, सरकारच्या निष्क्रियतेचे खापर प्राण्यांवर फोडतायत !, अशा  शब्दांत राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी जलसंधारणमंत्री तानाजी सावंत आणि शिवसेनेवर हल्ला चढवला.

खेकड्यांनी पोखरल्याने भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले असावे, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. ही एकप्रकारची नैसर्गिक आपत्ती होती. काही विधिलिखित गोष्टी असतात त्या घडतात. त्या कुणाच्याच हातात नसतात, असेही सावंत म्हणाले.

यावर मंत्री सावंत यांचा अजित पवार यांनी समाचार घेतला. कालवा फुटला,  तर उंदीर जबाबदार, धरण फुटले तर खेकडे जबाबदार ! मग मंत्रीपद का घेतले ? भाजपा-सेनेचे मंत्री स्वतःचे अपयश केव्हा मान्य करणार? असा संतप्त सवाल पवार यांनी केला. दरम्यान, जोरदार पावसामुळे रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १८  जण ठार झाले आहेत.