दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती – अजित पवार

0
692

पुणे, दि. २० (पीसीबी) – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिवंगत एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल जे विधान केले आहे. त्या बद्दल भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नसून ही निषेधार्थ बाब आहे. त्यामुळे हे भाजपवाले देशातील विचारवंत दाभोळकर, कलबुर्गीचे मारेकरी सापडले असते तर त्यांनाही भाजपाने उमेदवारी दिली असती अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवारांची प्रचार सभा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरुर मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहराचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कट करुन पालकमंत्री गिरीश बापट यांना भाजपने कोणत्या आधारावर तिकीट दिले. याबाबत अनेक वेळा विचारणा केली. पण त्यावर भाजपकडून कोणी बोलण्यास तयार नाही. पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी पुण्याचा कोणता प्रश्न सोडविला हे सांगावे असा सवाल उपस्थित करीत गिरीश बापट यांना टोला लगावला.

आम्ही काय घोड मारलं – अजित पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आजवर देशातील अनेक राजकीय कुटुंबांवर टीका करताना पाहिले होते. मात्र आता मागील काही दिवसापासुन पवार कुटुंबाला लक्ष्य करीत आहेत. हे पाहून आम्ही काय घोडं मारलं अशा शब्दात अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पवार परिवाराचा विषय निवडणुकीचा मुद्दा कसा काय होऊ शकतो, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.