शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील संघर्षांला अखेर तोंड फुटले…

0
786

सोलापूर, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत शरद पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात गेली दहा वर्षे सुरू असलेली धुसफूस अखेर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्दय़ावरून बाहेर पडली. मोहिते-पाटील गटाने पवारांची साथ एकदाची सोडून भाजपशी घरोबा करणे पसंत केले. मातबर नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपले पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह तमाम सहकाऱ्यांना भाजपमध्ये पाठविले. दोन दिवसांपूर्वी अकलूजमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर प्रचार सभेत मोहिते-पाटील यांनी व्यासपीठावर हजर राहून मोदी यांच्या हस्ते सत्कार स्वीकारला, तरी त्यांनी स्वत: मात्र अधिकृत भाजपमध्ये प्रवेश केला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी सोडल्यानंतर मोहिते-पाटील गटावर पवार यांनी आतापर्यंत थेट टीका केली नव्हती. परंतु बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार प्रथमच मोहिते-पाटील यांच्यावर कडाडले. त्यामुळे पवार व मोहिते-पाटील गटात आता उघड संघर्षांला तोंड फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पडल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात माढा लोकसभा मतदार संघ पवार आणि मोहिते-पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात प्रतिष्ठेचा बनविला आहे. भाजपने माढय़ाची जागा हिसकावून घेण्यासाठी मोहिते-पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करून भाजपने आपला इरादा स्पष्ट केला आहे.

राष्ट्रवादीच्या अभेद्य गडाला सुरुंग लावणारे आणि भाजपच्या पाठीशी ताकद उभी करणारे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वत: भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील मोहिते-पाटील यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला गेला नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर पवार आणि मोहिते-पाटील यांनी एकमेकांविरुद्ध जाहीर वक्तव्ये करणे आजवर टाळले होते.

तथापि, अखेर शरद पवार हे बारामती लोकसभा मतदार संघात आपल्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना मोहिते-पाटील यांच्यावर गरजले. त्याला नैमित्तिक कारण ठरली ती अकलूजमधील पंतप्रधान मोदींची सभा. अकलूजच्या विराट सभेत मोदींनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडताना मोहिते-पाटील यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला होता. तोच धागा पकडून पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर निशाणा साधला.

अकलूजच्या सभेत पंतप्रधानांच्या शेजारी उसाची देयके थकविण्याचा उद्योग करणारे साखर कारखानदार हजर होते. पंतप्रधान मात्र शेतक ऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांचे हित जोपासणारे म्हणून माझ्यावर टीका करीत होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या मोहिते-पाटलांनी शेकडो कोटींचे बँक कर्ज थकविले आहे. एक साखर कारखाना विकला आणि दुसऱ्याचे पैसे थकविले. बारामतीत राष्ट्रवादीच्या विरोधात सोलापुरातून काही भुरटे येऊन बसतात, अशा शब्दात पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर पुन्हा एकदा कडवट शब्दात टीकास्त्र सोडले. या टीकेमुळे उभय नेत्यांमधील संघर्षांला तोंड फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या दहा वर्षांत पक्षात घुसमट

राज्याच्या राजकारणात एके काळी दबदबा ठेवणारे मातबर नेते मोहिते-पाटील यांनी नैसर्गिक स्वरूपात शरद पवार यांचे नेतृत्व सहजासहजी मान्य केले नव्हते. १९९९ साली पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर महिनाभर विचार करून मोहिते-पाटील हे पवारांच्या सोबत गेले. तरीही राष्ट्रवादीत ते खऱ्या अर्थाने रमले नव्हते. विशेषत: गेल्या दहा वर्षांत तर त्यांची चांगलीच घुसमट झाली. अखेर त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. आगामी काळात पवार-मोहिते संघर्ष कोणते टोक गाठणार आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण कोणते वळण घेणार, हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे.