दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

0
831

कोलंबो, दि. २९ (पीसीबी) – ईस्टर सणावेळी चर्च व आलिशान हॉटेलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले होते. याची खबरदारी म्हणून आज सोमवारपासून श्रीलंका सरकारने संपूर्ण चेहरा कपड्याने झाकण्यावर बंदी घातली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला आहे. मुस्लीम महिलांचा बुरखा किंवा निकाब याचा उल्लेख न करता केवळ ओळख पटावी म्हणून लोकांनी चेहरे झाकू नयेत असं सिरिसेना यांनी म्हटलं आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘कोणत्याही प्रकारे चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ओळख पटण्यावर अडचण होईल असा कोणत्याही प्रकारे चेहरा झाकू शकत नाही. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.’ असे श्रीलंका सरकारनं स्पष्ट केले आहे. साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ISISने घेतली होती. त्यानंतर सरकारने या नव्या कठोर बदलांची मागणी केली होती. अखेर त्यावर निर्णय घेत बुरखा आणि चेहऱ्यावर कपडा बांधण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे.

श्रीलंकेत शुक्रवारी झालेल्या चकमकीत १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामध्ये बॉम्बस्फोटातील सुत्रधाराच्या वडिल आणि दोन भावांचाही मृत्यू झाला आहे. रॉयटर्सने पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या चकमकीत जेनी हाशीम, रिलवान हाशीम आणि सुत्रधाराचे वडिल मोहम्मद हाशीम यांना शुक्रवारी पूर्व भागात झालेल्या चकमकीत मारले. या तिघांचा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये येथिल स्थानिकांविरोधात बोलत असल्याचे दिसत होते. दहशतवाद्यांना प्रेरणा देत असल्याचेही यामध्ये दिसत होते. २१ एप्रिल रोजी रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तीन चर्च व तीन हॉटेलमध्ये ईस्टर संडेला झालेल्या बाँबस्फोटांमध्ये ३५९ जणांनी प्राण गमावले तर ५०० च्या वर नागरिक जखमी झाले. दहशतवादी सुशिक्षित होते, चांगल्या आर्थिक स्थितीतील होते व त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध होते असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बाँबस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं घेतली.