“…तेव्हा आम्ही तुम्हाला मांडीवर खेळवलं नाही का?”

0
148

बिहार, दि.२४ (पीसीबी) : बिहारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर आपल्या भाषणादरम्यान व्यत्यय आणणारे विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी नेते यांना ‘माझ्या मांडीवर खेळला आहेस’ अस म्हणत टोला लगावला आहे.

नितीश कुमार यांचं भाषण चालू असताना तेजस्वी यादव यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असतानाची आठवण करुन दिली. यावरुन नितीश कुमार म्हणाले कि, “जेव्हा आम्ही तिथे मंत्री होतो तेव्हा तुम्ही मांडीवर खेळत होतात. आम्ही तुम्हाला मांडीवर खेळवलं नाही का?”

नितीश कुमार राज्यपालांच्या अभिभाषणावर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उत्तर देत होते. नितीश कुमार यांनी यावेळी गेल्या १५ वर्षात सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखवत असताना वारंवार तेजस्वी यादव त्यामध्ये व्यत्यय आणत होते. यामुळे नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सुनावलं आणि म्हटलं की, “तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते नंतर सांगा, पण मी काय सांगतो ते आधी ऐका…यामुळे तुमचा फायदाच होणार आहे”.