नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदावरून नवनाट्य!

0
196

मुंबई,दि.२४(पीसीबी) – नाटय़परिषदेचा अध्यक्ष कोण, या वादात रोज नवनाटय़ रंगताना दिसत आहे. नुकताच नियामक मंडळाच्या 37 सदस्यांनी बहुमताने तात्पुरता कार्यभार नरेश गडेकर यांच्याकडे दिलेला आहे, तर प्रसाद कांबळी यांनी घटनेनुसार आपणच अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. अशातच नरेश गडेकर हे कार्यकारिणीच्या दोन बैठकांना अनुपस्थित नव्हते, त्यामुळे घटनेनुसार त्यांचे कार्यकारिणी सदस्यत्व रद्द झालेले आहे, असे पत्र प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी पाठवले आहे. त्यावर नियामक मंडळाच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा कांबळी यांचा खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.

हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर नाटय़परिषदेचा कार्यभार हाती घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी ते काल नाटय़परिषदेच्या कार्यालयात जाणार होते, तसे पत्र त्यांनी प्रमुख कार्यवाह यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला उत्तर देताना शरद पोंक्षे यांनी गडेकराचे 18 फेब्रुवारीच्या विशेष सभेतील अध्यक्षपदच घटनाबाह्य ठरवलंय. ‘23 डिसेंबर 2020 व 13 जानेवारी 2021 रोजी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेस अनुपस्थित राहिल्याने गडेकरांचे कार्यकारी मंडळाचे सदस्यत्व 14 जानेवारी 2021 रोजीच संपुष्टात आले होते. त्यामुळे ते उपाध्यक्ष पद (उपक्रम) भूषवण्यास पात्र नव्हते,’ असा दावा पोंक्षे यांनी केला आहे. हे पत्र प्रवक्ते मंगेश कदम यांनी पत्रकारांमध्ये शेअर केले.