तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे, घोळवे तुम्ही माफी मागा – माकप

0
174

पिंपरी, दि.९ (पीसीबी) – नवी द्ल्लीतील शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तान मधून रसद पुरवली जाते. दिल्लीतील आंदोलनासाठी 300 रुपये भाड्याने माणसे आणली जातात, असा असभ्य आणि असंस्कृत आरोप उपमहापौर केशव घोळवे यांनी महापालिका सभेत करून शेतकरी आंदोलनाची गंभीर चेष्टा केली आहे. तुम्ही सभ्य संस्कृतीचा अपमान केला आहे, शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडूलकर यांनी केली आहे.

ते म्हणाले, स्वतः उपमहापौर हे ऊसतोड कामगारांचे पुत्र आहेत, शहराचे ते सन्माननीय नागरिक आहेत. रामकृष्णाच्या संस्कृतीचा अहोरात्र जप करणाऱ्या त्यांच्या राजकीय विचारसरणीचा त्यांनी स्वतःच्या वक्तव्याने पराभव केला आहे. कलियुगातील या राम भक्तांनी अभंग गाथा आणि ज्ञानेश्वरीचे पारायण करावे. साहेब तुम्ही शेतकरी आंदोलनाचा अपमान करून वाचाळ संस्कृतीचे प्रदर्शन केले आहे, आपण जाहीर माफी मागून शेतकरी आंदोलनाचे समर्थन करावे, अशी मागणी केली आहे. तसेच सभागृहातील या वक्तव्याचा माकपने निषेध केला आहे.

उपमहापौर केशव घोळवे यांनी दिल्लीतील आंदोलनाबद्दल केलेल्या विधानावर अनेकांनी नापसंती दर्शविली आहे. ते म्हणतात…

पिंपरी चिंचवड शहरातील बहुसंख्य कामगार शेतकरी पुत्र आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलन चीन,पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा शोध तुम्ही कसा लावला,तुमची तारांकित राजकीय विचारसरणी अतिशय असभ्य आहे,तुम्ही उपमहापौर पदाची प्रतिष्ठा गमावली आहे. – बाजीराव गुजर (निवृत्त कामगार बजाज ऑटो प्राधिकरण) –
—————–

हि भाषा तुम्हाला शोभत नाही –

शहराचे उपमहापौर केशव घोळवे कामगार चळवळीतील नेतृत्व आहे,त्याचा आम्ही आदर करतो. शेतकरी आंदोलन नव्या कृषी कायद्या विरोधात आहे
लाखो आंदोलक शेतकऱ्यांचा अपमान करणारे तुमचे वक्तव्य निषेधार्ह आहे
पिंपरी चिंचवड शहराच्या कामगार चळवळीच्या इतिहासात शेतकऱ्यांबद्दल अशाप्रकारचे अपमानजनक विधान प्रथमच केल्याने समस्त कामगार आणि पिंपरी चिंचवडकराना तुमच्या वक्तव्याची शरम वाटते आहे. – श्री.सुशीलकुमार नहार.(कामगार नेते टाटा मोटर्स)
– ——————–
अभ्यास करून बोलायला शिका
साहेब तुम्ही प्रतिष्ठित पदावर आहात, तुमचे प्रत्येक वक्तव्य सर्वसमावेशक असले पाहिजे, हे शहर शेतकरी कामगार यांच्या मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक आहे,तुमच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान अपमान झाला आहे.
शेतकरी आंदोलकांच्या मागण्याना तुमचा पाठिंबा का नाही
कॅप्टन रघुनाथ सावंत ( निवृत्त सैनिक घरकुल)