तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला घ्यावे लागेल – उद्धव ठाकरे

0
567

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – राम मंदिर नाही, तर भविष्यात हे सरकार राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा अयोध्येत जाऊन देणाऱ्या शिवसेनेने या मुद्द्यावरून पुन्हा केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. मंदिर बांधण्यासाठी लागणारी हिंमत नसल्यानं काँग्रेसला जनतेने धूळ चारली आणि हिंमतवान छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या. पण त्यांना सर्वत्र काँग्रेसच दिसत असेल तर, तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला घ्यावे लागेल, असा घणाघात शिवसेनेने केला.

राम मंदिराच्या निर्माणाचे वचन हे काँग्रेसचे नसून, भाजपचे आहे, अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. २०१९पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा विसर पडलेल्यांना त्याचे स्मरण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो होतो, असं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारवर ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला. अयोध्येतील आमच्या ललकारीनंतर मोदींनी प्रथमच राम मंदिराचा उल्लेख केला. इतक्या वर्षांनी त्यांनी राम मंदिराचा उच्चार केला. आमची अयोध्या यात्रा यशस्वी झाली. ते उठले आणि त्यांना जाग आली, असा टोला शिवसेनेने लगावला.