तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी

0
606

काबुल, दि. ६ (पीसीबी) : अफगाणिस्तानमध्ये अनागोंदीची स्थिती तयार झालीय. तालिबानने अफगाणवर ताबा मिळावला. मात्र, इतके दिवस होऊनही अफगाणमध्ये सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यामागे तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील वादाचं कारण असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता यावर शिक्कामोर्तब झालंय. आज (5 सप्टेंबर) सत्तेवरुन तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे समर्थक थेट भिडले. यावेळी झालेल्या गोळीबारात तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला बरादर जखमी झालाय.

दोहा शांतता चर्चेत समावेशक सरकार स्थापन करण्याचं आश्वासन देणारं तालिबान हक्कानी नेटवर्कच्या भूमिकेने अडचणीत येतंय. तालिबानचा सह-संस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर अल्पसंख्यक समुहांना सरकारमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन आणि त्याची दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्क कुणाही सोबत सत्ता वाटून घेण्याला विरोध करत आहे. अशातच आता या दोन्ही गटांमध्ये झडप झाली. परिस्थिती इतकी चिघळली की गोळीबार झाला. यात मुल्ला बरादर जखमी झाला.

हक्कानी गट मध्ययुगीन काळातील सरकारसाठी आग्रही
पंजशीर ऑब्जर्वर आणि एनएफआर ने दिलेल्या वृत्तानुसार, या भांडणात गोळीबारही झाला. त्यामुळेच तालिबानने सरकार स्थापन करणं पुढे ढकललं आहे. सरकारचं नेतृत्व करणारा मुल्ला बरादर सध्या उपचार घेत आहे. हक्कानी नेटवर्क आगामी सरकार मध्ययुगीन काळाप्रमाणे कट्टर असावं असा आग्रह करत आहे. तसेच यात काहीही आधुनिक नसावा यासाठी दबाव आणत आहे.

एकिकडे तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल शहर आपण जिंकल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे हक्कानी नेटवर्क हे शहर आपण जिंकल्याचा दावा करत आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमधील मतभेद कमालीचे वाढल्याचं स्पष्ट होतंय. त्यातच पाकिस्तानची गुप्तहेर संघटने आयएसआय चे प्रमुख लेफ्टिनंट जनरल फैज हमीद सध्या काबुलमध्ये आहेत. ते या दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यातही पाकिस्तानसाठी हक्कानी गट अधिक जवळचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हक्कानी गटाच्या मागण्यांना अधिक महत्त्व दिलं जात आहे. यात तालिबानवरील दबाव मात्र वाढताना दिसत आहे.