ताथवडे येथे गोळीबारात एकजण जखमी

0
2100

वाकड, दि. २ (पीसीबी) : हॉटेलजवळ सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या एका कारचालकावर अज्ञात तिघा हल्लेखोरांनी गोळीबार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.१) रात्री साडेअकराच्या सुमारास ताथवडे येथील सर्विसरोडवर असलेल्या  हॉटेल कोल्हापुरीजवळ घडली.

हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३०, रा. सुतारवाडी, पाषाण, मुळ रा. राजस्थान) असे गोळीबारात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात अज्ञात तिघा हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हरिओम हे ताथवडे येथील सर्विसरोडवर असलेल्या हॉटेल कोल्हापुरीजवळील पान टपरीवर सिगारेट घेण्यासाठी त्याच्या कारने आले होते. त्यावेळी अज्ञात तिघेजण त्यांच्या कारमध्ये गपचूप जाऊन बसले. हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा कारमध्ये आले असता आरोपींनी हरीओम यांच्या पोटाला पिस्तूल लावले आणि मोटार पुढे घेण्यास सांगितले. यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एका आरोपीने हरिओम यांच्यावर गोळीबार केला.  गोळी हरिओम यांच्या पायाला लागून ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश माने तपास करत आहेत.