तळेगावात वाळू माफीयाची सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन जीवेमारण्याची धमकी

0
869

तळेगाव, दि. १९ (पीसीबी) – अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेऊन तो ट्रॅक्टर कारवाईसाठी नेत असताना तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्याला ट्रॅक्टर मालकाने भररस्त्यात आडवून धक्काबुक्की करत जीवेमारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार (दि.१७) सकाळी साडेदहाच्या सुमारास तळेगाव पोलीस ठाणे हद्दीतील कातवी गावातील इंडीयण ऑइल पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी तहसील कार्यालयातील कर्मचारी संदीप कांतीलाल माळोदे (वय २९, रा. राधामाधव बिल्डींग, प्लॅट नं. ८, तळेगाव-दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, ट्रॅक्टर मालक दामोदर भोजणे (रा. माळवाडी, ता. मावळ) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणने आणि सरकार कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी मावळच्या तहसीदार सुनंदा भोसले यांनी अवैधरित्या सुरु असलेल्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला होता. यावर पुढील कारवाईसाठी वाळूने भरलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयातील कर्मचारी संदीप माळोदे हे कातवी गावातील इंडीयण ऑइल पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरुन नेत होते. यावेळी ट्रॅक्टर मालक दामोदर भोजणे तेथे आला आणि त्याची दुचाकी ट्रॅक्टरच्या आडवी लावली. तसेच ट्रॅक्टर चालक आणि दोन कामगारांच्या मदतीने जबरदस्ती ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावर फेकून देण्यास सुरुवात केली. यावर माळोदे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच फोटो देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी भोजणे याने त्यांना धक्काबुक्की करत जीवेमारण्याची धमकी दिली आणि ट्रॅक्टर पळवून नेला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दामोदर भोजणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी भोजणे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.