तळेगावमध्ये देशी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एकाला अटक

0
680

तळेगाव, दि. १९ (पीसीबी) – देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसांसह एका तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.१८) तळेगाव आढे येथील जिल्हा परिषदच्या शाळेसमोर करण्यात आली.

सुधीर विठ्ठल सुतार (वय २८, रा. मैजे आढे, पोस्ट, उर्से) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुन्हे शाखेचे युनिट २ चे पोलीस कर्मचारी तळेगाव एमआयडीसी येथे जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस नाईक दत्तात्रय बनसोडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून तळेगाव आढे येथील जिल्हा परिषदच्या शाळेसमोर हिरव्या रंगाचा टि शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातलेला इसम संशयीतरित्या उभा असून त्याच्याजवळ हत्यार आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन सुधीर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीसांनी पिस्तूल आणि काडतुसांसह सुधीर याला अटक केली. त्याच्यावर विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक दिपाली मरळे तपास करत आहेत.