…तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल – शरद पवार

0
182

औरंगाबाद, दि. ७ (पीसीबी) : राज्यांमधील निवडणुकीचा देशातील ट्रेंड हा भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळमध्ये भाजप नाही. तामिळनाडूत नाही. कर्नाटकात नाही. तेलंगणात नाही. आंध्रात नाही. गोव्यात नव्हती, आमदार फोडून राज्य आणले. महाराष्ट्र बाजूला ठेवा. गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. हे मान्य करू. मध्यप्रदेशात आमदार फोडले राज्य आणले. यूपीत भाजपची सत्ता आहे. झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी भाजप नाही. भाजप फक्त गुजरात, यूपी आणि आसाममध्ये आहे. म्हणजे राज्याच्या निवडणुकीत लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड कायम राहिला तर या देशात वेगळं चित्र बघायला मिळेल. हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. एकत्र येऊन आपण पर्याय दिला पाहिजे ही विरोधकांची मानसिकता आहे, असंही पवार यांनी सांगितलं.

शरद पवार हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. विरोधी पक्षातील एकही पक्ष सर्वच्या सर्व जागा का लढवू शकत नाही? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. विरोधी पक्षातील पक्ष जागा लढवू शकतात. पण कशासाठी जागा लढवायच्या? एकमेकांच्या पायात पाय घालून विरोधकांची शक्ती विभाजीत करून सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे काही शहाणपणाचं नाही. मर्यादित जागा लढवून आपली शक्तीस्थानं आहेत तिथे लक्ष केंद्रीत करता येईल का हे पाहणं राजकीय व्यवहाराचं लक्षण आहे, असं शरद पवार म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोण जातं याचा आढावा घेतल्यानंतर चिंता करण्याचं कारण नाही. माझ्या माहितीनुसार जे जात आहेत. त्यांच्याबद्दल फार चिंता करण्याची गरज नाही. वर्ष सहा महिने जाऊ द्या. अनुभव घेतल्यानंतर लोक निष्कर्षाला येतील. संबंध देश मोकळा आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी कुठेही जावं. त्यांना विरोध असण्याचं कारण नाही. त्यांनी जे पैशाचं शेतकऱ्यांना वाटप केलं. त्याचा अर्थकारणावर परिणाम काय होईल ते दिसेल. सरकारचा पैसा वाटण्यासाठी घालवायचा किंवा वाटप करण्यावर घालायचा हे पाहावं लागेल, असं ते म्हणाले.

येत्या 12 तारखेला पाटणा येथे होणारी विरोधकांची बैठक पुढे ढकलली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दोन तीन लोकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना तारीख बदलायची सूचना केली. त्यांच्या काही कमिटमेंट आहेत, म्हणून त्यांनी विनंती केली. या संदर्भात कालच मला नितीश कुमार यांचा फोन आला होता. तारीख बदलली तर चालेल का? असं त्यांनी मला विचारलं. त्यावर मी म्हटलं हरकत नाही. सर्वांना सोयीची तारीख ठेवा असं सांगितलं. आता 22 की 23 तारखेला बैठक होणार आहे.

केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहे. या सरकारमधील कोणता मंत्री तुमचा आवडता आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. काही लोकांचं काम वादातीत नाही. उदा. नितीन गडकरी. विकासाच्या कामात नितीन गडकरी यांचा रस असतो. शासन तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काही तरी रिझल्ट दिला पाहिजे. त्यात गडकरी आहे. गडकरींचं वैशिष्ट्ये म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोण ठेवत नाही. त्यांच्यासमोर एखादा प्रश्न मांडला तर कोण सांगतो या पेक्षा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे ते पाहतात. ही समंजसपणाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा अनुभव त्यांच्याबद्दलचाच आहे, अशा शब्दात त्यांनी गडकरी यांचं कौतुक केलं.

आज शेतकऱ्यांच्या घरात 50 टक्क्यापेक्षा जास्त कापूस आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती भयंकर आहे. केंद्र आणि राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. नाही दखल घेतली तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. राष्ट्रवादी त्यांच्या पाठी उभी राहील, असा इशारा त्यांनी दिला. सध्याच्या सरकारचा दृष्टीकोण शेती आणि शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह नाही. कांदाची निर्यात बंदी का करावी. साखरच्या निर्यातीला मर्यादि दिल्या आहेत. कोटा दिला आहे. दुसरीकडे साखरेच्या किंमती पडत आहेत. हे सर्व शेतकऱ्यांच्या हिताचं नाही, असंही ते म्हणाले.