तबलिगी जमातच्या २५०० विदेशी नागरिकांवर भारताने केली कारवाई

0
479

प्रतिनिधी,दि.४ (पीसीबी) : तबलिगी जमातशी संबंधित २५०० विदेशी नागरिकांवर भारताने कारवाई केली. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिकेतील टोगोलीस रिपब्लिक व म्यानमार या देशांमधून टूरिस्ट म्हणून आलेले परदेशी नागरिक हे तबलिगी जमातच्या धार्मिक कामासाठी विविध राज्यात आले होते. तबलिगी जमातच्या विदेशी नागरिकांना ब्लॅकलिस्ट करून त्यांना भारतात प्रवेश करण्यापासून १० वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. हे सर्व परदेशी नागरिक तबलिगीच्या कार्यक्रमांसाठी टूरिस्ट वीजाद्वारे भारतात येत होते.

कोरोना वायरस संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांना मार्च महिन्यात बंदी लादली होती. परंतु त्याच दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजसाठी मोठ्याप्रमाणात अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिकेतील टोगोलीस रिपब्लिक व म्यानमार या देशांमधून व भारतातील तबलिगी जमातचे लोक एकत्रित आले होते. लॉकडाऊन लागू होण्याआधीच अनेक तबलिगी भारताच्या विविध भागात गेले होते. तसेच लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मरकज मध्ये अडकलेल्या तबलिगींना मोठ्याप्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. देशातील २० राज्यात सुमारे ९ हजार तबलिगी पसरल्यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाचा फैलाव झाला. त्यानंतर तबलिगी जमातच्या प्रमुखांसह अनेकांवर फॉरेनर अ‍ॅक्ट व साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्लीतील मरकज मधून विविध राज्यात गेलेल्या तबलिगी जमातच्या लोकांचा तपास घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. टूरिस्ट वीजाद्वारे भारतात प्रवेश केलेल्या तबलिगी जमातच्या परदेशी नागरिकांना शोधून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या परदेशी नागरिकांचा विजा रद्द करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तसेच या विदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यापासून १० वर्षांसाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्वीटद्वारे दिली आहे.