तडीपार गुंडाने तुला बघून घेईन अशी धमकी देत पोलिसांना केली धक्काबुक्की

0
255

आळंदी, दि. २९ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीने गुन्हे शाखेच्या पोलीस शिपायाला बघून घेण्याची धमकी दिली. तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी पद्मावती झोपडपट्टी साठेनगर, आळंदी येथे घडली.

संभाजी उर्फ मनोज सखाराम जोगदंड (वय 21, रा. साठेनगर पद्मावती झोपडपट्टी, आळंदी) असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई सागर जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी जोगदंड याला 22 जानेवारी 2019 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपार आदेशाचा भंग करून तो कोणतीही परवानगी न घेता पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आला. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांना माहिती मिळाली असता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी फिर्यादी पोलीस शिपाई गेले. त्यावेळी त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस शिपाई जैनक यांना बघून घेण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.