टी २० लीगमध्ये युवराजचा सुपर धमाका!

0
551

मुंबई, दि, ३० (पीसीबी) – ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याने IPL नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीची घोषणा करताना त्याने देशांतर्गत टी २० स्पर्धेत आणि इतर टी २० लीगमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार सध्या युवराज GT20 Canada या टी २० स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. पण आता त्याला सूर गवसला असून त्याने नुकतीच दमदार ४५ धावांची खेळी केली.

टोरँटो नॅशनल्स या संघाकडून तो GT20 Canada या स्पर्धेत खेळत आहे. तो संघाचा कर्णधार आहे. या स्पर्धेत टोरँटो नॅशनल्सचा सोमवारी विनीपेग हॉक्स या संघाविरुद्ध सामना रंगला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या युवराजने दमदार खेळी केली. त्याने कॅनडाचा फलंदाज रोड्रिगो थॉमस याच्यासोबत ७७ धावांची भागीदारी केली. युवराजने २६ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार यांच्या सहाय्याने ४५ धावा केल्या. फलंदाजी करताना युवराजने गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. १७३ पेक्षाही अधिकच्या स्ट्राईक रेटने त्याने धावा ठोकल्या. याशिवाय युवराजने सामन्यात २ षटके टाकत ड्वेन ब्रावोला तंबूत धाडले.