कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा; भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांचे आवाहन

0
583

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि पुणे जिल्हा ग्रामीणमधील १० अशा एकूण १३ विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी शक्तीकेंद्र प्रमुखांच्या मेळाळ्यात केले.

त्यावेळी हाळवणकर यांनी एक तास संघटनात्मक बैठक घेत सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि शक्तीकेंद्र प्रमुखांचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्वांनी केलेल्या सूचनांचा पक्ष पातळीवर निश्चित विचार करण्याचे आश्वासन दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जास्तीत जास्त पक्ष सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

पिंपरी-चिंचवडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना किमान तीन लाख राख्या पाठवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रास्ताविक करताना पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्यातील विविध योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आखल्या. त्याचा लाभ लाखो गरजूंना आजपर्यंत मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ प्रतिमा असलेले देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही कामाला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या भाजपच्या पाठीशी पिंपरी-चिंचवडमधील जनता असल्याचे यावेळी आमदार जगताप म्हणाले.