टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’चे दिमाखात प्रकाशन

0
258

पिंपरी,दि. 6 (पीसीबी) – टाटा मोटर्स कंपनीच्या ‘कलासागर’ या दिवाळी अंकाचे अभिनेते सौरभ गोखले आणि अनुजा गोखले या दाम्पत्याच्या हस्ते दिमाखात प्रकाशन झाले. अंकाचे हे 40 वे वर्ष आहे. हा अंक 236 पानी असून यामध्ये मराठी कथा कवितांचा सर्वाधिक समावेश आहे.

सौरभ गोखले आणि अनुजा गोखले हे दोघेही मूळ पुण्याचे आहेत. सौरभ गोखले यांनी टाटा मोटर्सच्या नाट्यविभागातूनच आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अनुजा गोखले यांनी अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. कलाक्षेत्रामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या अंकासाठी सुमारे 167 कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या अंकासाठी आपले साहित्य दिले आहे.

अंक लेखनासाठी विशेष उल्लेखनीय म्हणजे 76 महिलांनी आपले लेख व कविता दिल्या आहेत. ललितलेखासाठी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ते लेख या अंकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. अंकामध्ये 5 लेख, 15 कथा, 34 कविता, ललित आणि इतर विशेष लेख व वार्षिक राशीभविष्य याचा समावेश आहे.

प्रत्येक माणसामध्ये अंगभूत काही कला लपलेल्या असतात. या कलांवर हळुवार फुंकर मारुन त्या फुलविण्याचे काम टाटा मोटर्सच्या माध्यमातून टाटा मोटर्स कलासागर अव्याहत करत आलेले आहे. असेच काही गुणी कलाकार टाटा मोटर्सने प्रकाश झोतात आणले आहेत. टाटा मोटर्समधील कर्मचाऱ्यांना आपले नेहमीचे काम करुन आपल्या कलेला वाव देता यावा म्हणून चार दशकांपूर्वी टाटा मोटर्स कलासागरची स्थापना करुन कंपनी व्यपस्थापनाने कर्मचाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. याच कलासागरने टाटा मोटर्स व समाजाला अनेक नामांकित कलाकार दिले. कलासागरच्या नाट्य, संगीत, साहित्य आणि कला या चार शाखांपैकी साहित्य शाखा 39 वर्षे अविरतपणे दिवाळी अंक प्रकाशित करीत आहे.

आजपर्यंत कलासागरच्या दिवाळी अंकास 11 पारितोषिके मिळाली आहेत. पारितोषिकांमध्ये मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पुणे, शब्दगंध साहित्यीक परिषद, अहमदनगर व दामाणि पुरस्कार, सोलापूर यांचा उल्लेख करता येईल. कलासागरच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन स्वर्गीय पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते झाले आहे. त्यानंतर अनेक मान्यवरांचा दरवर्षी या अंकास स्पर्श झाला आहे. त्यापैकी स्वर्गीय सर्वश्री वसंत कानेटकर, शिवाजीराव भोसले, नारायण सुर्वे, शांता शेळके तर सर्वश्री श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, फादर फ्रान्सीस दिब्रेटो, रामदास फुटाणे, जगदीश खेबुडकर, अरुण दाते, श्रीधर फडके, 2011 मध्ये अजय अतुल, 2012 मध्ये राहुल देशपांडे आणि 2013 मध्ये संदिप खरे, 2014 मध्ये आनंद भाटे, 2015 मध्ये शौनक अभिषेकी, 2016 मध्ये पंडीत विजय घाटे, 2017 मध्ये वैभव जोशी, 2018 मध्ये सुबोध भावे, 2019 मध्ये सुमीत व चिन्मयी राघवन यांच्या हस्ते करण्यात आले.