भाजपच्या आजी – माजी नगरसेवकांकडून सभागृहनेत्याचा उद्धार

0
393

पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – भाजपमध्ये आता गटबाजीला उधाण आले आहे. वाकडच्या रस्ते विकास विषयावर राज्य सरकारला अभिवेदन करण्याचा पत्रप्रपंच अयोग्य असल्याचा कांगावा करत भाजपच्या आजी – माजी नगरसेवकांनी सभागृहनेत्याचा चांगलाच उद्धार केला. सभागृहनेता महापालिका कारभार करण्यात अपयशी ठरत असल्याची लाखोली त्यांनी वाहिली. महापालिका वर्तुळात हा विषय चर्चेचा होता.

ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई – बेंगलोरकडे जाणारा रस्ता विकसीत करण्याचा (२० कोटी ३३ लाख रुपये) आणि प्रभाग क्रमांक २५ मध्ये काँक्रीटीकरण करणे (३० कोटी ६९) असे ५१ कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव स्थायी समितीने नुकतेच फेटाळले आहेत. त्या विरोधात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्याच्या नगर विकास खात्याकडे दाद मागितली आहे. त्यावर नगर विकास खात्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अभिप्राय मागविला. आयुक्तांनी त्यावर रस्ते विकासाच्या बाजूने सकारात्मक अभिप्राय दिला. तथापि, कोणतेही कारण न देता स्थायी समितीमध्ये वाकडचे रस्ते विकासाचे प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले. स्थायी समितीने फ़ेटाळलेले दोनही प्रस्ताव मंजूूर करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले. स्थायी समितीने फेटाळलेले रस्ते विकासाचे प्रस्ताव विखंडित करण्याच्या अनुषंगाने पहिल्यांदा निलंबीत करण्यात आले. याबाबत अभिवेदन करावयाचे असल्यास ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे सादर करावे. या कालावधीत अभिवेदन प्राप्त न झाल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

लेखी अभिवेदन करण्याची जबाबदारी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वादात न पडता ‘बॅलन्स’पणे पत्र तयार केले. त्यामुळे भाजप आमदाराचे पित्त खवळले. संतोष लोंढे हे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असल्याने त्यांना बोलण्यात काही हशील नसल्याचे उमगताच सर्व राग सभागृहनेते नामदेव ढाके यांच्यावर काढण्याचे ठरले. भाजपचा एक माजी नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकाला सभागृहनेत्याच्या अंगावर सोडण्यात आले. या दोघांनी बुधवारी (दि.२८) सायंकाळी सभागृह नेत्याला त्याच्याच ‘अ‍ॅण्टी चेंबर’मध्ये जाब विचारला. आयुक्त तुमचे ऐकत नसतील तर राजीनामा द्या आणि घरी बसा. पक्षाची बदनामी होत असून तुम्ही अकार्यक्षम आहात, असे अत्यंत कठोर शब्दात सभागृहनेत्याला सुनावण्यात आले. हा वाद विकोपाला गेल्यावर स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांनी मध्यस्थी करत वादावर पडदा घातला. अ‍ॅण्टीचेंबरमधील वादाची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात सुरु होती.

दरम्यान, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सभगृहनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. तर भाजपच्या प्रत्यक्षदर्शी पदाधिकार्याने या बाचाबाचीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.  
————————