ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन 

0
878

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अफलातून टायमिंग आणि अंगभूत अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे आज पहाटे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अभिनयाच्या क्षेत्रातील एक हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

मरठी, इंग्रजी रंगभूमी, मराठी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि जाहिराती अशा सर्वच माध्यमांत प्रधान यांनी काम केलं होतं. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील खट्याळ आजोबा, ‘जब वुई मेट’मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसंच, दूरदर्शन वाहिनीवरील ‘गजरा’ कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता. प्रधान यांनी दीड डझनहून अधिक इंग्रजी नाटकांमध्ये भूमिका केल्या. मूळचे नागपूरचे असलेल्या प्रधान यांना कुटुंबातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. प्रधान यांच्या आई मालतीताई प्रधान नाटकांतून काम करायच्या. त्या वातावरणातच ते मोठे झाले. प्रधान हे उच्चशिक्षित होते. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातून एम. ए. केले. पुढं ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस)मधून दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवीही मिळवली होती.

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी विविध स्पर्धा, एकांकिका व नाटकांतून कामं करायला सुरुवात केली. पुढं ते त्यातच रमले. नाटकाच्या आवडीतून त्यांनी हौशी नाट्यवेड्यांना घेऊन ‘नटराज’ ही संस्था काढली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून काही नाटकंही रंगभूमीवर आणली. त्याचबरोबर स्वत: अभिनय करून रंगभूमी गाजवली. ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी एकापेक्षा एक भूमिका रंगवल्या होत्या.