सहगल यांना न बोलावल्याने महाराष्ट्राचे नाक कापले- विनोद तावडे

0
605

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावले गेल्याने महाराष्ट्राचे नाक कापले गेल्याचे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. यवतमाळच्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही हे सांगणे सरकारचे काम नसते. नयनतारा सहगल वादाशी सरकारचे काहीही घेणेदेणे नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्यावेळी संमेलन परिसरात निषेधाचे सूर उमटताना पाहायला मिळाले. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरु असतानाच विचारमंचासमोर काही महिलांनी नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून आपला निषेध व्यक्त केला. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याचा निषेध या महिलांनी व्यक्त केला. त्यानंतर तातडीने या महिलांकडून मुखवटे काढून घेण्यात आले आणि त्यांना बाहेर काढण्यात आले. याचबरोबर यवतमाळमधील विजय ठाकरे या नागरिकाकडून नयनतारा यांच्या मराठी भाषणाच्या प्रतिंचंही वाटप केलं. त्यामुळे हे संमेलन वादग्रस्तच ठरत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंच्या भाषणादरम्यान काही निदर्शकांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली.

नयनतारा सहगल वादात मुख्यमंत्र्यांचे नाव गोवले जाणे गैर आहे. सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याचा साहित्य महामंडळाचा निर्णय सरकारलाही पटला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नाक कापले गेले अशी तिखट प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर मराठी भाषेच्या संवर्धनसाठी हे सरकार विशेष प्रयत्न करत असल्याचेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. सगळ्या शाळांना चौथीच्या वर्गापर्यंत मराठीची सक्ती करण्यात आली आहे. हा नियम ज्या शाळा डावलतील त्यांच्यावर कारवाई होईल असाही इशारा तावडे यांनी दिला.