जागतिक दिवाळी, हे हिंदू संस्कृतीचे भूषण !

0
351

जगात दिवाळी कुठे, कशी साजरी होते… दिवाळी हा हिंदु संस्कृतीतील महत्त्वाचा सण ! हिंदू हे तेजाचे उपासक असल्याने दिवाळीमध्ये दीप लावून अग्निनारायणाची उपासना केली जाते. दिवाळीच्या कालावधीत दक्षिणायन चालू असल्याने सूर्यास्त लवकर होऊन सर्वत्र लवकर अंधार पसरतो. या अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करून ज्ञानरूपी तेजाचे प्रक्षेपण करण्यासाठी दिवाळीत सर्वत्र दिवे लावले जातात. दिव्याच्या ज्योतीमुळे वातावरणाचीही शुद्धी होते. भारतीय लोक जगभर विखुरल्याने ही संस्कृतीही सर्वत्र पोहोचली. दिवाळी या सणाने तर सातासमुद्राच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. काही वर्षांपासून अमेरिकेच्या ‘व्हाईट हाऊस’मध्येही दिवाळी हा सण साजरा होत आहे, तर अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष जनतेला आवर्जून दिवाळीचा संदेश देतात. १४ आॅक्टोबर २००९ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या अध्यक्षीय घरात पूर्वेकडील खोलीत वैदिक मंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलन केले होते. (संदर्भ : indianamericancommunitynews.com)

१. नेपाळ
लेखिका कल्याणी गाडगीळ यांनी देश-विदेशात साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवाळीविषयी माहिती संकलित केली आहे. त्यामध्ये त्या लिहितात, ‘नेपाळमध्ये दिवाळी हा सण ‘तिहार’ म्हणून साजरा केला जातो. यातील पहिल्या ‘काग तिहार’च्या दिवशी कावळ्यांसाठी गोडधोड पदार्थ घराच्या छपरावर ठेवून दिले जातात. दुसर्‍या म्हणजे ‘कुकुर तिहार’च्या दिवशी माणसाच्या कुत्र्याशी असलेल्या अतूट नात्याचा आदर म्हणून कुत्र्याची आरती केली जाते. कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून गळ्यात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड दिले जाते. नंतर ‘गायतिहार’ म्हणजे गायीची पूजा आणि शेवटी लक्ष्मीपूजनही होते.
२. इंडोनेशिया
इंडोनेशियातील बाली बेटावर देवळांना दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी केली जाते.
३. सिंगापूर
सिंगापूर येथे सार्वजनिक आतषबाजीला बंदी आहे; मात्र दिव्यांची आरास करतांना भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे रूप सगळीकडे विपुल प्रमाणात वापरलेले दिसते.
४. मलेशिया
मलेशियामध्ये दिवाळीत शॅडो पपेट सावल्यांचा खेळ मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. या माध्यमातून रामायण आणि महाभारत यांच्या कथा सांगितल्या जातात.
५. थायलंड
थायलंडमध्ये दिवाळी ‘लुई क्रॅथोंग’ म्हणून साजरी केली जाते. केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवलेले सहस्रो दिवे नदीमध्ये सोडले जातात.
६. फिजी
फिजी या पॅसिफिक बेटात पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. या वेळी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धांना आरंभ होतो.
७. इंग्लंड
लंडन शहरातूनही दिवाळीनिमित्त मोठी मिरवणूक निघते. यामध्ये भारतीय कपडे, नाच आणि कपडे यांचे मनोहारी दर्शन होते.
८. न्यूझीलंड
न्यूझीलंडच्या ऑकलंड आणि वेलिंग्टन या शहरांत दिवाळीच्या दोन आठवडे आधी मेळा साजरा केला जातो. त्याचे उद्घाटन थेट पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून केले जाते. ‘बी हाईव्ह’ या संसदेच्या इमारतीसमोर भलीमोठी रांगोळी काढली जाते. तेथील भारतीय मंदिरांमधून अन्नकूटाचे आयोजन होते.’

दिवाळीचा गुह्यार्थ
श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार आणि दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्त केले अन् प्रभुविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले. तीच ही ‘दीपावली’ आपण वर्षानुवर्षे केवळ एक रुढी म्हणून साजरी करत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरुपी अंधःकाराचे, तसेच भोगवृत्ती आणि अनाचारी, आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य न्यून (कमी) होऊन त्यांचे सज्जन शक्तीवरील वर्चस्व न्यून होईल. दिवाळीच्या निमित्ताने जीवाकडून झालेले धर्माचरण आणि साधना यांमुळे जीवाचे आत्म्याशी अनुसंधान जोडले जाऊन त्याच्यातील आत्मतेज प्रगट होते. याच आत्मतेजामुळे जीवाला आत्मानंदाची अनुभूती येते.

हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !
केवळ सण-उत्सवांच्या निमित्तानेच नव्हे, तर प्राचीन मंदिरे, तेथील प्रथा-परंपरा यांमधूनही विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीचे अस्तित्व दिसून येते. अन्य पंथांचा उदय होण्याच्या आधी सनातन वैदिक हिंदु धर्म हाच एकमेव धर्म होता, हेच यातून अधोरेखित होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासह चार जणांनी आग्नेय आशियाचा अभ्यासदौरा केला. या दौर्‍याच्या वेळी विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा पहायला मिळाल्या.

१. इंडोनेशिया
इंडोनेशिया एक द्वीपसमूह अणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी तेथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात. ‘भारतापासून ४ सहस्र किलोमीटर लांब असलेल्या इंडोनेशिया बेटावर पूर्वीपासून हिंदु संस्कृती कशी विद्यमान होती याचे उदाहरण म्हणजे पेट्रोलपंपावर द्वारपाल म्हणून स्थापन केलेली श्री गणेशमूर्ती ! १५ व्या शतकापर्यंत इंडोनेशियात हिंदु राजांचे राज्य होते. तेथील जावा द्वीपावर अनेक शतकांपासून रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य कला प्रसिद्ध आहे. योग्यकर्ता शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर ‘प्रंबनन’ नावाचे गाव आहे. येथे ‘चंडी प्रबंनन‘ नावाचा मंदिरांचा समूह आहे. ‘चंडी‘ म्हणजे मंदिर आणि ‘प्रबंनन म्हणजे परब्रह्मन्’. ‘परब्रह्म मंदिर समूह’ असा याचा अर्थ होतो. एके काळी विश्‍वातील सर्वांच उंच असलेले हे मंदिर पाहण्यासाठी प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. या मंदिराच्या भव्य परिसरात प्रतिदिन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य सादर केले जाते.

२. श्रीलंका
श्रीलंकेतील कोलंबो शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असणार्‍या ‘केळनिया’ या गावात बिभीषणाचे एक प्राचीन मंदिर आहे.

३. जपान
जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणार्‍या शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते. ११ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिर’ हे येथील सर्वांत प्राचीन मंदिर आहे. इ.स.पूर्व ८०६ मध्ये ‘कोबोदेशी’ या जपानी संतांची चीनचा प्रवास करून जपानमध्येे मंत्रायाना या पंथाचे ग्रंथ, विविध मूर्ती, तसेच धार्मिक ग्रंथ आणले होते. याच संतांनी जपानमध्ये हिंदु देवतांच्या प्रार्थना आणि पूजा करायला आरंभ केला. जर्मनीचा विचारवंत फिलीप फ्रांझ व्हान शिबोल्ड याने वर्ष १८३२ मध्ये टोकियो (सध्या जपानची राजधानी) शहरात श्री सरस्वतीदेवीची १३१ मंदिरे आणि श्री गणेशाची १०० मंदिरे मोजून त्यांची संख्या नमूद केली होती. जपानच्या कुसा या भागातील १२ व्या शतकातील ‘श्री गणेश मंदिरा’ला राष्ट्रीय संपत्ती मानले जाते. जपानचे सांस्कृतिक सल्लागार शिगेयुकी शिमानोरी यांनी एका भारतीय वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘हिंदु देवतांच्या अभ्यासासाठी बुद्धीवंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जपान करत आहे’, असे म्हटले होते.

४. मलेशिया आणि थायलंड
याशिवाय मलेशिया, थायलंड येथील मंदिरे, तेथील प्रथा यांद्वारे तेथे असलेल्या हिंदु संस्कृतीची ओळख होते.

वर उल्लेख केलेली उदाहरणे ही केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. अभ्यासाच्या अंती विश्‍वभर पसरलेली हिंदु संस्कृती, तिचे वैशिष्ट्य, उपासनांमधील समान धागा पाहून सनातन हिंदु धर्माच्या विश्‍वव्यापकपणाची प्रचिती येते. सनातन धर्माची पताका अशीच विश्‍वात फडकत राहो आणि सण-उत्सव धर्मशास्त्राला अनुसरून साजरे करता येऊन धर्माचरणातील आनंद सर्वांना घेता येवो, अशी धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

– श्री.सुनील ओजाळे, सनातन संस्था