तरुणीवर ऍसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

0
290
  • लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासली

बीड, दि. १५ (पीसीबी) – दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या तरुणीवर ऍसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट ( ता. बीड ) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत ( लिव्ह इन रिलेशनशिप ) राहत होते अशी माहिती समोर आली आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव ( ता.देगलूर जि. नांदेड ) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के टक्के शरीर भाजले होते. पहाटे 3 वाजता घटना घडलेली असतांनाही अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्या लगत तब्बल 12 तास पडून होती. दुपारी 2 वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर ( ता.बीड ) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. उपचार सुरू असताना रविवार दि.15 नोव्हेंबर रोजी पहाटे तिचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेने खळबळ उडाली असून अंत्यत निर्दयीपणे तरुणीला जाळून तिला अर्धमेल्या अवस्थेत टाकून फरार झालेल्या आरोपीच्या अटकेची मागणी होऊ लागली असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.