“जहाँ दो कौडी के लोग अपना…”; राऊतांच्या ट्विटचा निशाणा कोणावर??

0
204

मुंबई, दि.०९ (पीसीबी): कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु असतानाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. उस जगह हमेशा, खामोश रहा करो जहाँ, दो कौडी के लोग, अपना गुण गाते होते हो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘दो कौडी के लोग’, असा टोला नेमका कोणाला हाणला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यावर कारवाई केल्यापासून दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणाची इंटरव्हलनंतरची पटकथा मी लिहणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले असते. परिणामी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटवरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

संजय राऊत मंगळवारी सकाळी सपत्नीक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जाते. मात्र, तरीही या भेटीत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात कोणती महत्त्वाची चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एनसीबीचा पंच प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलाशानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊतही आक्रमक झाले होते.इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितलं, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला होता