जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होऊ शकते – जयंत पाटील

0
489

मुंबई,दि.२१(पीसीबी) – “जलयुक्त शिवार हा जलसंधारण विभागाचा विषय आहे. मात्र जलयुक्त शिवार योजनेत जी कामे झाली आहेत ती चौकशीस पात्र आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या वृक्षलागवड योजनेनंतर आता जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी होऊ शकते”, असे संकेत राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत.

मागील सरकारची आणखी एक जलयुक्त शिवार ही मोठी योजना होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र आता या योजनेचाही पंचनामा करण्याचे आघाडी सरकारचे संकेत आहेत.

जलयुक्त शिवारामुळे ७२ टीएमसी पाणी महाराष्ट्रात अडवले गेले, अशी जी वल्गना मागच्या सरकारने केली होती, ती खरी नव्हती हे लोकांच्या लक्षात आले. पाणी अडवले असते तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील दुष्काळ कमी झाला असता. पण तशी परिस्थिती नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही या योजनेतील कामांच्या चौकशीची मागणी केली होती, असं पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, या योजनेंतर्गत राज्यात पाणी किती अडवले याची मोजणी त्यावेळच्या सरकारने केली. ७२ टीएमसी म्हणजे जवळपास कोयनेच्या धरणातील पाणी देखील आपण एवढे वापरत नाही एवढे पाणी अडविल्याचा दावा केला गेला. एवढे पाणी दुष्काळी भागात साचले असे म्हटले आहे. तर मग किमान महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाली असती, पण तशी काही परिस्थिती नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.