जयंतरावांचं अचूक नियोजन, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच या नेत्याने भाजपला डिवचलं

0
384

मुंबई, दि.23 (पीसीबी) : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. त्यानंतर जयंतरावांच्या अचूक नियोजनाकडे लक्ष वेधत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला डिवचलं.

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला. काँग्रेसने समर्थन दिलं. काँग्रेसचा उपमहापौर, तर स्थायी समिती अध्यक्ष झाला. महापालिकेत भाजप हद्दपार झाली. जयंत पाटील यांची कामगिरी उल्लेखनीय होती” असं तपासे म्हणाले.

विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जयंत पाटलांविषयी वेगवेगळी वक्तव्यं करत होते. मात्र पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी जिंकताच भाजप पश्चिम महाराष्ट्रात हद्दपार होणार, हे निश्चित झालं होतं. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयानंतर यावर शिक्कामोर्तब झालं. भाजपला भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाहीत, हे स्पष्ट झालं. जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं, तर भाजपला दरवाजा दाखवला” असं महेश तपासे म्हणाले