जबरदस्तीने कंपनीत येऊन राडा घालणा-या दोघांना अटक

0
230

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – आम्हाला न विचारता कंपनीत कामगारांची भरती कोणी केली. असे म्हणत दोघांनी कंपनीत राडा घातला. कंपनीच्या मालकाला आणि सुरक्षा रक्षकाला दमदाटी केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना चाकण एमआयडीसी येथील तायल पकेजिंग प्रा ली या कंपनीत 14 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घडली.

सचिन मोहन पाचपुते (वय 33 रा. वासुली, ता. खेड), मयूर दिलीप कारले (रा. चांदूस, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जय राजेश अगरवाल (वय 24, रा. बोपोडी, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीत माल भरण्यासाठी येणारा ट्रक आरोपींनी अडवला. आरोपी मयूर याने कंपनीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून बेकायदेशीरपणे कंपनीत प्रवेश केला. ‘महिला कामगार आम्हाला न विचारता कोणी भरती केली’ अशी आरोपीने विचारणा केली. त्यांनतर फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ‘कंपनी थ्रू लेडीज कशी काय ठेऊन घेतली. आम्हाला का विचारले नाही’ असे म्हणून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली. ‘तुझ्या कंपनीत काम करणारे लेबर काढून घेतो असे म्हणून आरोपीने कंपनीतील लेबर काढून घेतले. त्यांनतर फिर्यादी यांना ‘तू तुझ्या कंपनीत माझ्या व्यतिरिक्त दुसरे लेबर कसे ठेवतो ते मी पाहतो. कंपनीची तोडफोड करतो. तू कसा व्यवसाय करतो तुझी गाडी सुद्धा बाहेर चालू देणार नाही’ अशी धमकी देत फिर्यादी यांना धक्काबुक्की करून चिंधीचोर अशी शिवीगाळ करत कंपनी तोडून टाकण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.