“जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करु नये”

0
653

– पुण्यात अजित पवारांचे लक्षवेधी बॅनर

पुणे, दि.२१ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या विविध कारणांनी चर्चेत आहेत. त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी तसंच त्यांच्या दोन-तीन बहिणींच्या घरीही आयकर विभागाने केलेली कारवाई..! तपास यंत्रणांनी अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे कार्कर्ते चांगलेच पेटले आहेत. पुण्यातील दक्षिण भागांत अजितदादांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. बॅनरवरील अजितदादांचा फोटो मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, कारण त्यावर अजितदादांच्या हातात तलवार असल्याचा फोटो आहे..!

अजित पवार सध्या आयकर विभागाच्या कारवायांनी दुखावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भावनिक होत, ‘माझ्यावर काय कारवाई करायती ती करा, छापेमारी करा, पण अजितदादांच्या बहिणी म्हणून कारवाई होत असेल तर ते बरोबर नाही’, असं म्हटलं. दादा भावनिक झालेत, हे कार्यकर्त्यांनी ओळखलं. अजित पवारांचा शुक्रवार-शनिवारी पुण्यात दौरा होता. लागलीच पुण्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढून दादांचं स्वागत केलं. आता रॅलीला 10 दिवसही पूर्ण होत नाही तोपर्यंत आता पुण्यातील दक्षिण भागांत अजितदादांच्या समर्थनार्थ बॅनर्स लागलेत. कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात हे बॅनर्स लागले आहेत.

बॅनरवर अजित पवार यांचा तलवार हातात घेतलेला फोटो आहे. बरं फक्त फोटोच नाहीय तर त्यावरील मजकूर देखील तेवढाच आक्रमक आणि बेधडक आहे. जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करु नये, असा आशय बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे. साहजिक रोख आहे तो भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे…! कारण किरीट सोमय्या यांनी मागील दीड महिन्यांपासून अजित पवार यांच्यावर आरोपांची राळ उडवलीय. जरंडेश्वरचा मालक कोण?, हा प्रश्न गेली कित्येक दिवस ते दररोज विचारतायत. वेगवेगळ्या शहरांत जाऊन ते पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत.

साहजिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर किरीट सोमय्या आहेत. म्हणूनच अजित पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यातल्या विविध भागांत बॅनरबाजी केली जातीय. अजित पवार ज्या ज्या वेळी पुण्यात येतील त्या त्या वेळी मोठं शक्तीप्रदर्शन केलं जातंय. अजित पवारांचं खास पद्धतीने स्वागत केलं जातंय. अजितदादंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होतीय, त्यातून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एकच संदेश द्यायचाय, ‘दादा तुम्ही एकटे नाही आहात…!, अशी चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात होत आहे.