“महाज्योती संस्था ही ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला?”

0
303

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : महाज्योती संस्था ही ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री तसंच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना केलाय. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? राज्य सरकार, मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाज्योती संस्थेवर गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केलीय.

अति सन्माननीय विजय वडेट्टीवार हे ओबीसी आणि भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागीर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोल आणि हसं या प्रस्थापितांच्या सरकारनं करुन ठेवलं आहे. ‘बड्या बड्या बाता आणि धोरण खातंय लाथा’ अशी वडेट्टीवार यांची गत झालीय. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचं दाखवायचं आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार साहेबांचं धोरण असल्याची घणाघाती टीकाही पडळकर यांनी केलीय.

MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीनं परीक्षा घेतली. यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणं क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देतेय. मात्र, दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देतेय. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 10 ते 25 हजार निधी मिळतो. महाज्योतीकडून मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरु असल्याचा घणाघातही पडळकरांनी केलाय.

सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केलं. तर तीन दिवसांत निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवर यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसलेत? महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे की त्यांना त्रास द्यायला? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी या प्रश्नांचं उत्तर द्यावं, असं आव्हान पडळकर यांनी दिलंय. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘येड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, असं सांगतानाच पडळकर यांनी यूपीएससी परीक्षेवरून वडेट्टीवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याचबरोबर लोकसंखेने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात 52 टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचं राजकारणं केलं. या समाजासाठी त्यांनी काहीही केलं तर नाहीच ऊलट काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात वसंतरावनाईक भटके विमुक्त महामंडळ तर यांनी दाखवायलाही ठेवलं नव्हतं. यासर्वांवर उपाय म्हणून मा. देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना करून तातडीने 380 कोटींचा निधीही मंजूर केला. पण आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं आहे, असा आरोप पडळकरांनी केला होता.