जगज्जेता हॅमिल्टन नव्हे आता ‘सर’ लुईस हॅमिल्टन

0
438

लंडन, दि. 31 (पीसीबी) : फॉर्म्युला वन शर्यतीचा जगज्जेता लुईस हॅमिल्टन आता पुढील वर्षापासून ‘सर’ लुईस हॅमिल्टन म्हणून ओळखला जाणार आहे. मायकेल शूमाकरच्या सात जगज्जेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या हॅमिल्टनचा ब्रिटनच्या राजघराण्याच्या वतीने नव्या वर्षी नाईटहूड सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. ब्रिटन राजघराण्याच्या वतीने दरवर्षाच्या अखेरीस कला, क्रीडा, व्यवसाय आणि राजकारणात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. या वर्षी करोना विषाणूच्या संसर्गावर काम करून उपाय शोधणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे या वर्षी सन्मान होणाऱ्यांची संख्या देखिल अधिक असणार आहे.

फॉर्म्युला वन शर्यतीत सात जगज्जेतेपदानंतर लुईस हॅमिल्टनला ‘सर’ किताबाने सन्मानित करण्यात येत असतानाच १९६६च्या विश्वकरंडक फुटबॉल विजेत्या संघातील एकमेव हयात खेळाडू जिमी ग्रीव्ह्ज यांना केवळ एमबीई पुरस्काराने सन्मानित करण्यावरून सोशल मिडीयावरून जोरदार चर्चा सुरू आहे. इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये चेल्सी, टॉटेनहॅम आणि वेस्ट हॅम अशा विविध संघाकडून खेळताना ३५७ गोल, इंग्लंडसाठी ५७ सामन्यात ४४ गोल, १९६६च्या विश्वकरंडक विजेत्या संघातील हयास सदस्य अशी सरस कामगिरी करूनही त्यांना ‘सर’ किताबापासून दूर ठेवण्यात आल्यामुळे ब्रिटनच्या फुटबॉल चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

या वर्षी ३५ वर्षीय हॅमिल्टन याने शूमाकरच्या कारकिर्दीमधील सर्वाधिक शर्यती जिंकण्याचा विक्रम मोडला. ब्रिटनमधल्या कायदा तज्ज्ञांनी गेल्याच महिन्यात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे नाईटहूड सन्मानासाठी हमिल्टनच्या नावाची शिफारस केली होती. लीडस ऱ्हिनोज संघाचा रग्बी खेळाडू रॉब बुरो, माजी फुटबॉलपटू जिमी ग्रीव्ह्ज, रॉन फ्लॉवर्स, बॉब चॅंपियन, रग्बीचे संघटक रॉब बॅक्सटर, रग्बा कर्णधार ज्यो सायमंडस यांचाही या वेळी सन्मान करण्यात येणार आहे.