चेक प्रजासत्ताकची विजयी सलामी

0
396

ग्लासगो, दि.१५ (पीसीबी) – अनेक कालखंडानंतर आंरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या स्कॉटलंडचे विजयाचे स्वप्न पॅट्रिक शिक आणि पर्यायाने चेक प्रजासत्ताकने धुळीला मिळविले. शिकने नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर चेक प्रजासत्ताने २-० असा विजय मिळविला.

सामन्याचा पूर्वार्ध संपताना शिकच्या हेडरने चेक प्रजासत्ताकचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात अवघ्या फुटबॉल विश्वाला थक्क करणारा गोल करून त्याने स्कॉटलंडला विजयापासून दूर नेले. शिकचा हा गोल युरो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत लांबवरून झालेला आणि कायमचा आठवणीत राहिल असा होता. शिकने ५९ यार्डावरून मारलेल्या किकने गोलपोस्टचा अचूक वेध घेतला.

स्कॉटलंडने तब्बल २३ वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन केले होते. पण, चेक प्रजासत्ताकने त्यांच्या पुनरागमनाच्या आनंदावर विरझण पाडले.

हॅम्पडेनेच्या मैदानावर १२ हजार प्रेक्षकांनी हा सामना पाहिला. नोव्हेंबर २०१९ नंतर प्रथमच या मैदानाने प्रेक्षकांना आपल्या अंगावर खेळवले.

स्कॉटलंडच्या युरो स्पर्धेच्या पात्रतेत गोलरक्षक डेव्हिड मार्शलचा महत्वाचा वाटा होता. त्याने या वेळी देखिल खूप प्रयत्न केले. पण, शिकच्या त्या गोलने त्यालाही चकित केले. उत्तरार्धात स्कॉटलंडने जरुर आक्रमक खेळ करायला सुरवात केली. त्यांनी रचलेल्या काही चाली निश्चित धोकादायक होत्या. पण, चेक प्रजासत्ताकच्या गोलरक्षकाने त्यांना यश लाभू दिले नाही. शिकलाही पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक साधण्याची चांगली संधी होती. पण, मार्शलने त्याची संधी व्यर्थ घालवली.

स्लोवाकियाची सनसनाटी
आजच्या दुसऱ्या सामन्यात स्लोवाकियाने मॅन टू मॅन खेळ करत सनसनाटी निकालाची नोंद केली. त्यांनी पोलंडचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या १८व्या मिनिटाला वोसिएच सिझेस्नी याच्या स्वयंगोलने पोलंडच्या निराशेला सुरवात झाली. त्यानंतर उत्तरार्धानंतरच्या पहिल्याच मिनिटाला कारोल लिन्नेटी याने मोकळ्या जागेचा फायदा उठवत अतिशय शांतपणे गोल करून पोलंडला बरोबरी राखून दिली. पण, वेग ती अचूकता त्यांना नंतर दाखवता आला नाही. त्यानंतर क्रिशोवेक याला रेड कार्ड मिळाल्याने पोलंडला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यानंतर मिलान स्क्रिनेरने गोलची संधी साधून स्लोवाकियाला विजयी केले. मैदानावर वर्चस्व राखूनही पोलंडसा विजय मिळवता आला नाही. त्यांचा प्रमुख खेळाडू लोवांडोवस्की याला आलेले अपयश यांनी स्लोवाकियाच्या गोलरक्षकांने केलेली अचूक कामगिरी यामुळे त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागले.