मेस्सीच्या अर्जेंटिनाला चिलीने बरोबरीत रोखले

0
232

रिओ दी जानेरो (ब्राझील), दि.१५ (पीसीबी) – मेस्सीने आपल्या लौकिकाला साजेशा फ्री-किकवर गोल करून अर्जेंटिनाचेखाते उघडले. मात्र, त्यानंतरही अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेत चिलीविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.

या महिन्यात विश्व करंडक पात्रता फेरीत मेस्सीची फ्री-किक चिलीचा गोलरक्षक क्लाऊडियो ब्राव्हो याने अफलातून डाईव्ह मारून अडवली होती. पण, या वेळी मेस्सी सरस ठरला. मेस्सीने २५ मीटरवरून मिळालेल्या या फ्री-किकवर अगदी नेटच्या कोपऱ्यातून जाळीचा वेध घेतला.

चिलीने या स्पर्धेत निर्धारित ९० मिनिटात कधीच अर्जेंटिनावर विजय मिळविलेला नाही. मात्र, २०१५ आणि १६ मध्ये अंतिम फेरीत त्यांनी पेनल्टी शूट आऊटमध्ये त्यांच्यावर मात केली आहे. या वेळी देखील त्यांना अर्जेंटिनावर मात करता आली नाही. मेस्सीने गोल केल्यावर त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.
अर्जेंटिनाविरुद्ध गोल केल्यावर सहकऱ्यांसह आनंद व्यक्त करताना व्हर्गास.

दुखापतीमुळे चिली या वेळी अॅलेक्सी सॅंचेझशिवाय खेळत आहे. अर्जेंटिनाच्या धारदार आक्रमणासमोर केवळ गोलरक्षक ब्राव्होमुळे त्यांचा गोलफलक विश्रांतीपर्यंत एकवर मर्यादित राहिला होता. त्यांना या वेळी नशिबाने साथ दिली. उत्तरार्धात १३व्या मिनिटाला गोलपोस्टमध्ये झालेल्या धसमुसळ्या खेळाचा अर्जेंटिनाला फटका बसला. पंचांनी त्यांना पेनल्टी नाकारली होती. पण, चिलीने वारची (तिसरा पंच) मदत घेतली आणि पंचांनी चिलीला पेनल्टी बहाल केली. त्यानंतरही व्हिडालची जोरकस किक अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझ याने अडवली. मात्र, त्याला चेंडू पकडता आला नाही. चेंडू मैदानातच राहिला आणि सतर्क राहिलेल्या व्हर्गासने हेडिंग करून चेंडूला जाळीची दिशा दिली.

पहिल्याच सामन्यात गुण मिळविल्याचा आनंद अर्जेंटिनापेक्षा चिलीला नक्कीच झाला. चिलीने गेल्या पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात चौथ्यांदा सामना बरोबरीत सोडवला.

आमचा आजचा खेळ बघता आम्ही ४-१ किंवा ५-१ असा विजय मिळवायला हवा होता. आम्ही गोल करण्याच्या किमान सहा ते सात संधी वाया दवडल्या. चिलीला अनिर्णित सामन्याचा नक्कीच आनंद असेल, अशी प्रतिक्रिया अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझ याने व्यक्त केली.