चिखलीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

0
1471

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणीने ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.२३) चिखली नेवाळेवस्ती येथे घडली.

कोमल प्रविण देवकर (वय २१, रा. लोहकरे यांची खोली, नेवाळेवस्ती, चिखली, मुळ रा.भाळवली, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल भाऊसो आसबे (वय ४५, रा. आसबेवाडी, ता. मंगळवेडा, जि. सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती प्रविण भारत देवकर (वय २५, रा. नेवाळेवस्ती, चिखली), सासरे भारत सोपान देवकर (वय ५५, भाळवली, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), सासू सजाबाई भारत देवकर (वय ४७), महादेव मोरे (वय ४५, रा. नेवाळेवस्ती, चिखली) आणि सुवर्णा महादेव मोरे (वय ४०) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल हिचा प्रविणसोबत काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. ते दोघेही सासरकडच्या मंडळींसोबत चिखलीतील नेवाळेवस्तीतील लोहकरे यांच्या भाड्याच्या खोलीत राहत होते. यावेळी सासकडच्या मंडळींनी कोमलच्या चारीत्र्यावर संशय घेतला. तिला वारंवार संसार चालविण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आणावेत म्हणून दबाव आणला. तसेच तिच्यावर पैसे चोरल्याचा आळ घालून शिवीगाळ करत मारहाण केली. यामुळे हताश झालेल्या कोमलने राहत्या घरात ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरकडच्या मंडळींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.