चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघातून बारणे यांना १ लाख ३८ हजार ५२ मतांची आघाडी; लक्ष्मण जगतापांनी दिलेला शब्द पाळला

0
1490

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात २ लाख १५ हजार ९१३ च्या मताधिक्यांनी विजय मिळालेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाने तब्बल १ लाख ३८ हजार ५२ मतांची आघाडी दिली आहे. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवडमधून आघाडी मिळवून देण्याचा शब्द पाळून युती धर्म निभावल्याचे स्पष्ट झाले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ हा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी आणि मावळ, तर रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल या सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळमध्ये समावेश होतो. मावळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा २ लाख १५ हजार ९१३ मतांनी विजय मिळवला आहे. श्रीरंग बारणे यांना ७ लाख २० हजार ६६३ मते, तर पार्थ पवार यांना ५ लाख ४ हजार ७५० मते पडली.

श्रीरंग बारणे यांना सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली आहे. केवळ कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांना १ हजार ८५० मतांची आघाडी मिळाली आहे. उर्वरित चिंचवड, पिंपरी, पनवेल, मावळ आणि उरण या पाच मतदारसंघाने बारणे यांना आघाडी दिली आहे. बारणे हे पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आहेत. बारणे यांना चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघांनी तब्बल १ लाख ३८ हजार ५२ मतांची आघाडी दिली आहे.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणुकीच्या वेळी श्रीरंग बारणे यांच्यासोबतचे सर्व मतभेद मिटवून बारणे यांना शहरातून १ लाखांहून अधिक मतांची आघाडी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना आघाडी मिळाल्याने आमदार जगताप यांनी युतीधर्म पाळत दिलेला शब्द खरा केला आहे. याशिवाय बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातूनही २१ हजार ८२७, उरण विधानसभा मतदारसंघातून २ हजार ८८८ आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातून ५४ हजार ६५८ मतांची आघाडी मिळाली आहे.