… हे तर अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे यश- शिवसेना

0
415

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने मतदान केले असून हे यश मोदी यांच्या लोकप्रियतेचे आणि अमित शाह यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचे आहे. नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला असून त्यांचे मनापासून अभिनंदन असे म्हणत शिवसेनेने मोदी- अमित शाह यांचे कौतुक केले आहे.

जनमताची नस पकडण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकवार यशस्वी ठरले असून २०१४चीच पुनरावृत्ती करीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दमदार विजय मिळवला आहे. २०१४मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी तब्बल ३०० जागांपर्यंत पक्षाने धडक दिली असल्याने एकहाती सत्ता स्थापित करण्याची क्षमता या पक्षाने कायम राखली आहे. शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातूनही या विजयासाठी मोदींचे कौतुक करण्यात आले आहे.

२०१४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाने एकतर्फी विजय प्राप्त केला होता. २०१९ मध्ये विरोधकांनी मोठे वादळ उठवल्याचा भास निर्माण केला. प्रत्यक्षात तो हवेचा झोकाही निघाला नाही. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निर्विवाद मुसंडी मारली व लालकिल्ल्यावर पुन्हा एकदा भगवा फडकला. याचे विश्लेषण कसे करणार?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. मोदी हेच देशाचे भाग्यविधाते असून मोदींसमोर संपूर्ण विरोधक पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. मोदी यांच्या तुलनेत विरोधी पक्षात प्रभावी नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व नाही, असेही अग्रलेखात म्हटले आहे.