चालू शैक्षणिक वर्ष ‘सक्षम राष्ट्र उभारणी वर्ष’ म्हणून साजरे करावे – शिवलिंग ढवळेश्वर

0
266

पुणे, दि.13 (पीसीबी) भारतदेशाला महाशक्ती बनविण्यासाठी चारित्र्य संपन्न नागरिक घडविणारी राष्ट्रीय चळवळ सुरु करावी. आजचे शालेय विद्यार्थी उद्याचे सुसंस्कृत जबाबदार नागरिक म्हणून पुढे आले पाहिजेत. यासाठी त्यांना राष्ट्रहिताबरोबरच अनौपचारिक शिक्षण दिले पाहिजे. यासाठी 2020-21 हे शैक्षणिक वर्ष ‘सक्षम राष्ट्र उभारणी वर्ष’ म्हणून साजरे करावे, अशी मागणी करणारे पत्र पुणे, भोसरी येथील संत साई हायस्कूलचे संस्थापक मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात कोरोना कोविड-19 च्या या काळात शैक्षणिक वर्षात 25 टक्के औपचारिक शिक्षण व 75 टक्के अनुभवात्मक आणि मूल्याधारीत अनौपचारिक शिक्षण असा शैक्षणिक आराखडा राबविला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मध्ये पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालकांनी काम करावे. आजची शिक्षणपद्धती ही प्रत्येक टप्प्यावर परीक्षा केंद्रीत आहे. भारत देश 21 व्या शतकात विश्वगुरु व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजन करीत आहेत. त्यासाठी भावी पिढी त्या दर्जाची तयार होणे गरजेचे आहे. म्हणून सुसंस्कृत सामाजिक मूल्य, कौशल्य विकास, आरोग्य सेवा, भारतीय संस्कृति, नितीशास्त्र, आहार-विहाराच्या सवयी, स्वदेशी वस्तूंचा वापर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी. यातूनच आत्मनिर्भर राष्ट्राची उभारणी होईल. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये किंवा 9 ऑगस्ट क्रांतीदिनाच्या दिवशी राष्ट्राला संबोधित करावे, अशी अपेक्षा ढवळेश्वर यांनी व्यक्त केली आहे.

अनौपचारिक शिक्षणामध्ये परिक्षेशिवाय विद्यार्थ्यांचा स्वयंविकास आणि वैयक्तिक वाढीवर लक्ष केंद्रीत करावे, यासाठी सर्व शाळांमधून देश सेवेतून राष्ट्र उभारणी करण्यासाठी सर्व शाळांमध्ये रोज एक तास आराखडा राबविण्यासाठी द्यावा. यातून बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्व विकसित होईल. तसेच 2020-21 हे शैक्षणिक वर्ष ‘सक्षम राष्ट्र उभारणी वर्ष’ म्हणून साजरे करावे, अशीही अपेक्षा शिवलिंग ढवळेशवर यांनी व्यक्त केली आहे.
ढवळेश्वर यांनी पाठविलेले पत्र पीएम कार्यालयाला मिळाले असल्याची पोहोच 8 जुलैं 2020 रोजी ऑनलाईन मिळाली आहे.