चार भारतीय खेळांचा खेलो इंडिया स्पर्धेत समावेश

0
282

नवी दिल्ली, दि.२१ (पीसीबी) गटका, कलारिपायाट्टू, थांग ता आणि मल्लखांब या खेळांना आगामी खेलो इंडिया युथ गेम्स २०२१ स्पर्धेत समावेश करण्यास क्रीडा मंत्रालयाने आज मान्यता दिली. ही स्पर्धा हरियाना येथे होणार आहे. क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाविषयी बोलताना क्रीडा मंत्री किरेन रिजीजू म्हणाले,’भारताला स्वदेशी खेळांचा मोठा वारसा आहे. हा वारसा जपणे, त्यांना प्रोत्साहन आणि लोकप्रिय करणे ही क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी आहे. या साठी खेलो इंडियासारखे दुसरे व्यासपीठ नाही.’

खेलो इंडिया स्पर्धेची लोकप्रियता आणि त्याचे स्टार स्पोर्टसवरून होणारे प्रक्षेपण लक्षात घेता आगामी स्पर्धेत या चार नव्या खेळांबरोबर योगासनाकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि युवा वर्ग या खेळाकडे वळण्यास प्रवृत्त होतील. भविष्यकाळात आम्ही आणखी स्वदेशी खेळांना खेलो इंडियाचा भाग बनवू, असेही रिजीजू यांनी सांगितले. हे नवे चारही खेळ देशाच्या विविध राज्यात खेळले जातात. कलारीपयाट्टू हा मुळ केरळचा खेळ असून, जगभरात त्याचा सराव केला जातो. मल्लखांब हा महाराष्ट्रातून पुढे आलेला खेळ असून, देशभर हा खेळला जातो. महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेशातही या खेळाची लोकप्रियता आहे. गटका हा खेळ पंजाबचा असून, मुळ ही निहांग शिख वॉरियर्स यांची युद्धकला आहे. स्व संरक्षणासाठी याचा अधिक उपयोग होतो. आता त्याला खेळाचा दर्जा मिळाला आहे. थांग ता हा मणिपूरचा पारंपरिक खेळ आहे. याला देखिल राष्ट्रीय मान्यता आहे.

या सर्व खेळाच्या संघटकांनी क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गटका संघटनेचे अध्यक्ष हरजीत सिंग गरेवाल म्हणाले,’आमच्या पारंपरिक खेळाचा खेलो इंडियात समावेश झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. या खेळाला ऐतिहासिक वारसा आहे. या खेळाच्या निमित्ताने तो एकाचवेळेस सर्वांसमोर येईल.’ थांग ता महासंघाचे सचिव विनोद शर्मा म्हणाले,’या स्पर्धेतील समावेशामुळे आमच्या खेळाला चांगली लोकप्रियता मिळेल. आम्हाला या स्पर्धेत चांगले यश मिळवायचे आहे. त्यामुळे आम्हाला आमचा खेळ अधिक पुढे नेण्यास सहाय्य मिळेल.’