‘औषधी उद्यान’ वाचवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘लढा’

0
262

– एमआयडसी प्रशासनला महापालिका जागेची मागणी करणार
– महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची सकारात्मक भूमिका

पिंपरी, दि. 21 (पीसीबी): पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक आरोग्याच्या हिताचा प्रकल्प असलेल्या ‘औषधी उद्यान’ ला वाचवण्यासाठी महापालिका ‘एमआयडीसी’ प्रशासनाला रितसर पत्रव्यवहार करणार आहे. तसेच, ‘निमा’ संस्था आणि आमदार महेश लांडगे एकत्रितपणे न्यायालयीन लढा उभारणार आहेत.

भोसरी मतदार संघाअंतर्गत मात्र एमआयडीसी हद्दीत असलेल्या सुमारे १ एकर भूखंडावर ‘औषधी उद्यान’चे काम सुरू आहे. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने संबंधित जागा विक्रीचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे, डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ संस्थेच्या पुढाकाराने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची कत्तल करावी, अशी मागणीही संबंधितांनी केली आहे.

यापार्श्वभूमीवर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी ‘निमा’ संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने वनीकरण वृक्षारोपण, आयुर्वेदिक झाडांची जोपासना करण्यासाठी २१ वर्षांच्या कराराने दिलेल्या भूखंडाची परस्पर विक्री केली आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या एमआयडीसीने वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेसमध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली असून याबाबत पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असा दावा डॉक्टरांसाठी काम करणाऱ्या ‘निमा’ या संस्थेने केला आहे.

‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांशी बैठक घेणार…
आमदार लांडगे म्हणाले की, संबंधित जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात मिळावी यासाठी महापालिकेने पत्र द्यावे. महापालिका प्रशासनाने देखभालीसाठी ही जागा ताब्यात घ्यावी. तशा मागणीचे पत्र मी महापालिका प्रशासनाला देणार आहे. याबाबत ‘एमआयडीसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठकही घेण्यात येणार आहे. यावेळी महापलिका याबाबत सकारात्मक असून, त्यावर त्वरीत तोडगा काढेल, असे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.