चाकण येथे कचरा वेचक दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा

0
557

चाकण, दि. १३ (पीसीबी) – ग्रामपंचायत हद्दीतील साफसफाई आणि कचरा गोळा केलेल्या कामाचे पैसे बँक खात्यातून काढून घेत एका दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना चाकण मेदनकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, रामदास मुरलीधर मेदनकर आणि त्यांचा मुलगा संकेत रामदास मेदनकर (दोघे, रा. मेदनकरवाडी, चाकण) या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिच्या पतीने मेदनकरवाडी ग्रामपंचायतीचा मे २०१८ ते जुलै २०१८ या कालावधीचे कचरा उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. याचे प्रति महिना बील १ लाख ८० हजार रुपये हे फिर्यादी यांच्या इंद्रायणी सहकरी बँक चाकण येथील खात्यात जमा केले जायचे. आरोपी रामदास यांनी फिर्यादी महिलेला तुम्हाला या पुढचे देखील कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो आणि प्रति महिना २ लाख ६० हजार रुपयांचे बिल काढून देतो असे आमिष दाखवले. तसेच माझ्या मुलाचे सध्या लग्न आहे असे सांगून फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा झालेले रक्कम काढून घेतले. तसेच ती रक्कम फिर्यादी यांना परत केली नाही. यावर फिर्यादी आणि त्यांचे पती पैसे मागण्यासाठी गेले असता रामदास यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांचा मुलगा संकेत याने लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी रामदास आणि संकेत या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक दहिफळे तपास करत आहेत.