चाकणमध्ये सख्या भावाला समजावून सांगणे पडले महागात; थोरल्या भावाने केले वडिल आणि धाकट्या भावावरच चाकुने वार

0
522

चाकण, दि. १० (पीसीबी) – सख्या भावाला समजवण्यासाठी त्याच्या घरी गेले असता थोरल्या भावाने सासऱ्यासह मिळून वडिल आणि धाकट्या भावावरच चाकुने वार केले. ही घटना गुरुवार (दि.९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास खराबवाडी येथे घडली.

निलेश मुरलीधर भांबेरे (वय ३०) आणि त्याचे वडिल मुरलीधर भांबेरे असे चाकुचे वार होऊन जखमी झालेल्या बाप लेकाची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश मुरलीधर भांबेरे (रा. खराबवाडी) आणि त्याचा सासरा महादेव गिते (रा. चिंचोली, ता शेगाव, जि बुलढाणा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गणेश याचा वडिल मुरलीधर यांच्यासोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सख्खा धाकटा भाऊ निलेश आणि वडिल मुरलीधर हे दोघे गणेश याच्या खराबवाडी येथील घरी गेले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि गणेश आणि त्याचे सासरे महादेव यांनी मिळून निलेश आणि मुरलीधर यांना मारहाण करुन त्यांच्यावर चाकुने वार केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.