केंद्रात भाजपचे ३००, तर राज्यात ४२ खासदार निवडून येतील; रावसाहेब दानवे यांचा दावा

0
521

जालना, दि. १० (पीसीबी) – ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मी अलिप्त असल्यामुळे अनेक चर्चा सुरू होत्या. त्या चर्चा माझ्या कानावरही आल्या. परंतू, ऊन लागल्यामुळे मी आजारी पडलो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला आराम करावा लागला, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. तसेच केंद्रात भाजपचे ३००, तर राज्यात युतीचे ४२ खासदार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले.

लोकसभा निवडणुकीत आम्ही वॉररुम तयार केली होती. या वॉररुमच्या माहितीनुसार तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिसादावरून आपण २ लाख ६० हजार मताधिक्क्याने निवडून येणार आहोत, असा दावा त्यांनी केला. परंतु नंतर त्यांनी मिश्कील शैलीत परीक्षा झाल्यानंतर आमच्या वडिलांना जास्त टक्केवारीची कधीच अपेक्षा नव्हती. ते फक्त पास झाला का, एवढेच विचारत होते, असे सांगत आपल्या विजयाचा दावा केला.

औरंगाबादला चंद्रकांत खैरेच निवडून येणार

औरंगाबादेत जावई धर्म पाळला गेला का?, असा प्रश्न त्यांना विचारला असता दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांचे कुटुंब माझ्या कुटुंबापेक्षा आधीपासूनच राजकारणात असल्याचे सांगितले. त्यांचा राजकीय वारसा माझ्यापेक्षा मोठा आहे. यामुळे त्यांना माझ्या मदतीची काही गरजच पडली नसल्याचे सांगून या निवडणुकीत चंद्रकांत खैरेच निवडून येतील, असेही दानवे म्हणाले.