चाकणमध्ये ड्रेनेजचे काम न दिल्याने व्यावसायिकाला मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी

0
1095

चाकण, दि. १३ (पीसीबी) – ड्रेनेजचे काम न दिल्याच्या कारणावरुन चार जणांच्या टोळक्यांनी एका व्यावसायिकाला जबर मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याकडे ५० हजारांची खंडणी मागीतली. ही घटना रविवारी (दि.९) रात्री आठच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील बापदेववस्ती येथील मारुती मंदिराजवळ घडली.

राजेंद्र जालिंदर काळे (वय ३१, रा. सिध्दीविनायकनगर, मेदनकरवाडी, चाकण) असे मारहाण करुन धमकवण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन हनुमंत कोतवाल, सत्यम दत्तात्रय कड, अक्षय सुरेश कड आणि महेश बबन कड (सर्व रा. बापदेववस्ती, कडाचीवाडी) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र काळे हे बांधकाम व्यवसायिक आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास बापदेववस्ती येथील मारुती मंदिराजवळ आरोपी सचिन, सत्यम, अक्षय आणि महेश या चौघाजणांनी आडवून ड्रेनेजचे काम त्यांना दिले नाही म्हणून जबर मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी दिली. तसेच ५० हजारांची खंडणीची मागणी केली. याप्रकरणी जखमी राजेंद्र यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. पोलीस उपनिरीक्षक पतंगे तपास करत आहेत.