पाच राज्यांतील पराभवानंतर भाजपला ‘या’ राज्यांतील निकालांमुळे दिलासा   

0
1473

गुवाहाटी, दि. १३ (पीसीबी) –  पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.  या पराभवामुळे भाजपला मोठा धक्का  बसला आहे. मात्र, आसाममधील पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीत  भाजप सर्वाधिक जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर  काँग्रेस दुसऱ्या क्रमांकांवर आहे.  

२६ हजार ८०८ जागांसाठी बुधवारी सुरु झालेली मतमोजणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत व्होटिंग मशिनऐवजी मतपत्रिकांचा वापर केला गेला होता. आतापर्यंत आमच्याकडे १२१८ पदांचे निकाल आले आहेत. ज्यामध्ये १०८९ ग्राम पंचायत सदस्य, ७१ ग्राम पंचायत अध्यक्ष आणि ५८ पंचायत समिती सदस्यांचा समावेश आहे, अशी माहिती आसामचे निवडणूक आयुक्त एच एन बोरा यांनी दिली.

ग्राम पंचायत निवडणुकीत भाजप ४८१ जागा जिंकला आहे. त्यानंतर काँग्रेसने २९४ आणि आसाम गण परिषदने ११५ जागांवर यश मिळवले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य आणि ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्या विविध पदांसाठी रविवारी (दि.९)  मतदान झाले होते.