चाकणमध्ये टेम्पोसहित ४७ लाखांचा गुटखा जप्त; टेम्पोचालकासह एकाला अटक

0
761

चाकण, दि. २९ (पीसीबी) – राज्यात विक्रीस बंदी असलेला तब्बल ४७ लाखांचा विमल गुटखा टेम्पोसहित चाकण पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी सातच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर करण्यात आली.

याप्रकरणी टेम्पोचालक अबुजार जमालउद्दीन शेख (रा. वसई, मुंबई) आणि अरुण रावसाहेब खोत      (वय ३२, सध्या रा, बिबवेवाडी, पुणे, मूळ रा. कासेगाव पंढरपूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चाकण पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती कि, चाकण येथे एक जण टेम्पोभर गुटखा विक्रीसाठी आणणार आहे. यावर पोलिसांनी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गाजवळ असलेल्या भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या समोर सापळा रचून टेम्पो आडवला. टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल पान मसाला, सुगंधी सुपारी आणि तंबाखू गुटखा आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसहित एकूण ४७ लाखांचा ऐवज जप्त केला. टेम्पोचालक अबुजार आणि त्याचा साथीदार अरुण या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार, अजय भापकर, ज्ञानेश्वर सातकर, शेखर कुलकर्णी  यांच्या पथकाने केली.