चाकणमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत केले अश्लील वर्तन; गुन्हा दाखल

0
816

चाकण, दि. ५ (पीसीबी) – मेदनकरवाडी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत एका शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.४) एका खाजगी महिला स्वयंसेवी संस्थेने शाळेतील आरोपी शिक्षकासह मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

बालाजी लिंबाजी डोंबे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी खाजगी महिला स्वयंसोवी संस्थेचे विश्वास चंदर सोनवणे (वय ५२) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी डोंबे हा मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे. त्याने काही दिवसांपूर्वी शाळेतील सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केले होते. मात्र डोंबे यांच्या भितीमुळे विद्यार्थिनींनी कुठेही घटनेबाबत वाच्यता केली नाही. महिला स्वयंसेवी संस्थांनी याबाबत माहिती मिळताच त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती विचारली असता पीडित विद्यार्थिनींनी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानुसार संस्थेने चाकण पोलीसात धाव घेऊन मेदनकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक बालाजी डोंबे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.