मावळ मतदारसंघात पार्थ पवारच्या उमेदवारीसाठी अजितदादाच आग्रही; पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक बोलावली

0
2347

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री व आमदार अजितदादा पवार यांचे पूत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताने पिंपरी-चिंचवड शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या मुलाला खासदार करण्यासाठी स्वतः अजितदादा आग्रही राहणार आहेत. पिंपरी-चिंचवडची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पार्थ पवार यांच्यासाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज घेत अजितदादांनी मावळ मतदारसंघात स्वतःच्या पुत्रासाठी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची अजितदादांनी चाचपणी चालविली आहे. त्यासाठी अजितदादांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक बोलावल्याचे समजते. या बैठकीत काय चर्चा होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा होते का?, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. २००९ मध्ये देखील या मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकला होता. त्यावेळी गजानन बाबर हे खासदार झाले होते. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत मदत केल्यामुळेच बारणे आणि बाबर या दोघांचेही खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यामुळे मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची अंतर्गत मदत होणाऱ्या उमेदवाराचाच विजय निश्चित होतो, असे राजकीय समीकरण बनले आहे. या समीकरणाला यंदा छेद देण्याचा राष्ट्रवादीचा इरादा दिसत आहे. अजितदादा आपले पुत्र पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची राजकीय खेळी खेळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून खळबळ उडाली आहे.

अजितदादांचे पुत्र मैदानात असतील, तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवक इतर राजकीय पक्षाच्या उमेदवाराला अंतर्गत मदत करणार नाहीत. तसे झाल्यास राष्ट्रवादीचा विजय सोपा होईल, असा राजकीय अंदाज बांधून पार्थ पवार यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. स्वतः अजितदादांनी देखील मावळ मतदारसंघात पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, असे स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आपल्या मुलाला खासदार करण्याचे अजितदादांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनेही संभाव्य उमेदवार निश्चित केले आहेत. या संभाव्य उमेदवारांसह विद्यमान खासदार तसेच आजी व माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे.

मुंबईतील बैठकीनंतर उमेदवार निश्चिती होऊन राष्ट्रवादी जोरदार कामाला लागण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर अजितदादा पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे समजते. त्याबाबत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांनाही निरोप गेला असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते. सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर अजितदादा पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात होणाऱ्या या बैठकीत काय चर्चा होते. त्यानंतर अजितदादा आपले पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करतात का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.